वेध माझा ऑनलाइन - नुकत्याच देशातील राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. यानंतर आता सर्वांचे लक्ष पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर लागले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बेनर्जी यासाठी विरोधकांची मुठ बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
'शरद पवारांना काँग्रेसचा पाठिंबा'
राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. 'शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले, तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल', असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
ममता बॅनर्जींचे शरद पवारांसह 22 नेत्यांना पत्र
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक तयारीला लागलेत. विरोध पक्षाची मूठ बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी 15 जून रोजी दिल्लीत संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी त्यांनी 22 विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र पाठवले आहे. यात, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे पिनाराई विजयन, ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एमके स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन, पंजाबचे भगवंत मान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह 22 प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment