Monday, July 1, 2024

T20 वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली रेव्ह पार्टी करण्यात आली ; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन।
29 जूनरोजी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने बाजी मारत विश्वचषकवर आपलं नाव कोरलं. भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. मात्र, येऊरच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली रेव्ह पार्टी करण्यात आली, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीच्या नेत्याने केलाय.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या भागात वाहतूक कोंडी मॅचमुळे नव्हे, तर रेव्ह पार्टीमुळे झाली होती. 80 टक्के लोक मुंबईतून आले होते असा आरोप केलाय. अनेक मोठ्या ड्रग पेडलर्सचा या पार्टीत मुक्त संचार सुरु होता, असंही आव्हाड म्हणाले आहेत.यबाबत त्यांनी काही ट्वीट देखील केले आहेत. यामुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.

“संजय गांधी नॅशनल पार्कमधून येऊरमध्ये प्रवेश करण्यात आला. हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एरिया आहे. पोलीस, वनखात्याला कारवाई करावी लागेल. प्रशासन आणि हॉटेल मालकाच साटंलोटं आहे” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “सुधीर मुनंगटीवर आणि आदिवासींची संयुक्त बैठक झाली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी वन खात्याला 6 वाजता दरवाजा बंद करण्याचे आदेश दिले होते”, असंही आव्हाड म्हणाले आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रात सायंकाळनंतर प्रवेशबंदी असतानाही शनिवारी रात्री येथे हजारोच्या संख्येने ढाबे, हॉटेलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी तरुण-तरुणी जमले होते. मद्य प्राशन करून येथे या तरुणांकडून प्रचंड गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले होते. काहीजण मद्याच्या बाटल्या घेऊन सार्वजनिक रस्त्यावर फिरत होते. या सर्व प्रकारानंतर संतापलेल्या आदिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी येऊर प्रवेशद्वारावर आंदोलन केले.याच प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
रात्री 12 वाजता आदिवासी बांधव आणि माता-भगिनी लहान मुलांसह हॉटेल बंद करा, आवाज बंद करा आणि वाहनकोंडी सोडवा अशी मागणी करत होते. मात्र, ठाणे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी धनाढ्य हॉटेल मालकांना संरक्षण देत आदिवासींवरच खोटे आरोप लावून त्यांना धमकावण्याचं पाप केलं. महाराष्ट्र सरकारने हे जंगल श्रीमंतांना विकले आहे. येऊरमधील बेकायदा बार आणि लाउंजवर कारवाई कधी होणार?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
वनविभाग, ठाणे पोलीस आणि महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रात्री आणि पहाटे येऊर रस्त्यावर फिरणाऱ्या मद्यधुंद लोकांमुळे आदिवासी महिलांना असुरक्षित वाटते, येऊरच्या आमच्या माता-भगिनींनी हा त्रास का सहन करावा? या हॉटेल्समधील स्पीकर्सच्या दणदणाटामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. हे ताबडतोब थांबण्याची गरज आहे. असं ट्वीट आव्हाड यांनी केलंय.

पुढे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे, मग त्यांनी येऊरमधील बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंट्सला अभय देण्याचा निर्णय का घेतलाय? यामध्ये त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का, ज्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचा ते प्रयत्न करतायंत?, असा संतप्त सवाल ट्वीटद्वारे आव्हाड यांनी केलाय.



No comments:

Post a Comment