लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलं असून त्यादृष्टीने जागावाटपावर चर्चा केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ३ प्रमुख पक्ष असल्याने जागावाटपावरून अनेकदा तेढ पाहताना मिळतोय. मात्र याच दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेला महायुतीत कमी जागा लढवण्याची तयारी दाखवल्याचे वृत्त समोर येत आहे. एकवेळ जागा कमी लढवू, पण नंतर सत्ता आल्यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ही दोन्ही मंत्रीपदे कायम ठेवा अशी दादांची अट असल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रात याबाबत बातमी आहे.
विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यामध्ये भाजप १२० ते १४० जागा लढवण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा मिळू शकतात. राज ठाकरेंची मनसे जर महायुतीत सामील झाली तर त्यांच्यासाठी सुद्धा १२ ते १४ जागा सुटू शकतात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळं महायुतीच्या जागावाटपात पक्षाला दुय्यम स्थान मिळण्याची शक्यता आहे. वस्तुस्थिती लक्षात घेऊन अजित पवार यांनीही जागावाटपाच्या मुद्द्यावर तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे. महायुतीच्या नेत्यांमधील नुकत्याच झालेल्या बैठकींची माहिती असलेल्या एका भाजप नेत्याने सांगितले की, महायुतीचा विजय झाल्यास उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदी कायम राहू, असे आश्वासन मिळाळ्यास जागांच्या बाबतीत तडजोड करण्यास अजित पवार तयार आहेत.
No comments:
Post a Comment