Friday, July 12, 2024

काँग्रेसची मतं फुटली ; गदारांवर कारवाई करणार; नाना पटोले आक्रमक;

वेध माझा ऑनलाइन । विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते योग्य रीतीने त्यांच्याकडे ट्रान्सफर न झाल्याचा फटका जयंत पाटलांना बसला. काँग्रेसची एकूण ३७ मते होती, मात्र त्यातील ८ मते फुटल्याचे स्पष्ट झालं आहे तर दुसरीकडे अजित पवार गटानेच यातील ५ मते फोडल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. या एकूण सर्व प्रकारानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच आक्रमक झालेत. ज्या कोणी आमदारांनी गद्दारी केली ते आम्हाला समजलं आहे. पक्ष त्यांच्यावर थेट कारवाई करेल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, मागच्या विधानपरिषद निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी काही बदमाश आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं होतं. मात्र तेव्हा ते आमदार कोण होते? याचा पत्ता लागला नव्हता. यावेळी आम्ही व्यूरचना आखली होती. या व्यूरचनेत काही बदमाश आमदार अडकले आहेत. त्यांच्याबाबत आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आहे. ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आहे, अशा लोकांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल. त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कुणी तसं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

No comments:

Post a Comment