Tuesday, July 9, 2024

मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी” ; शेतकरी नेत्यांची टीका :

वेध माझा ऑनलाईन ।
लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महायुतीचं पारडं हे महाविकास आघाडीच्या तुलनेत हलकं होतं. यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे आता महायुतीने आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महिलांसाठी योजनांच्या घोषणा केल्या.  त्यातीलच ‘लाडकी बहीण योजने’ बाबत शेतकरी नेते रघुनाथराव पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत टोला लगावला आहे.

नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात महिलांसाठी योजना राबण्यात आल्या आहेत.  त्यात  ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ याची जोरदार चर्चा आहे. यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 1500 रूपये मिळणार आहेत. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस मोफत दिले जाणार आहेत.

“मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी”

अशातच आता शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे. लाडकी बहीण योजना ही “मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी”, असा मिश्कील टोला रघुनाथ पाटील यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी योजनेच्या हेतूबाबत संशय व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment