Sunday, December 11, 2022

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला ; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली मोठी भूमिका ;

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागच्या काही दिवसांमध्ये वारंवार वादग्रस्त वक्तव्यं केली आहे. या मुद्द्यावरून काल महाराष्ट्राच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता कर्नाटकचे खासदारही ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.'आमचे खासदार केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून कर्नाटकची भूमिका मांडणार आहेत. दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी, यासाठी अमित शाह बैठक बोलावू शकतात. त्यांनी बैठक बोलावली की मी त्या बैठकीला उपस्थित राहीन,' असं बसवराज बोम्मई म्हणाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्राच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीवरही बोम्मई यांनी निशाणा साधला. 'महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही', असं ट्वीट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं.
बसवराज बोम्मई यांच्या या वक्तव्याचा शिंदे गटाकडून निषेध करण्यात आला आहे. 'अमित शहा यांच्या भेटीनंतरही काही फरक पडणार नाही, अशी भाषा म्हणजे उन्मादाची बाब आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. सर्वात मोठ्या पक्षाचे ते दोन वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत त्यांनी तडजोडीची भूमिका घेतल्यावरही आम्ही काहीच करू देणार नाही याचा अर्थ याला रगड म्हटल जातं, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर निशाणा साधला.

No comments:

Post a Comment