Friday, December 16, 2022

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ; "ते' वक्तव्य भोवणार ? न्यायालयात हजर रहावे लागणार :

वेध माझा ऑनलाइन - भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना बीडच्या शिरूर कासार न्यायालनाने समन्स बजावले आहे.  9 डिसेंबर रोजी हे समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ यांना शिरूर कासार न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 
चित्रा वाघ या शिरूर कासार दौऱ्यावर असताना त्यांनी 18 जुलै 2021 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी महेबूब शेख यांनी 2 ऑगस्ट 2021 रोजी शिरूर कासार पोलीस ठाण्यात वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. महेबूब शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
महेबूब शेख यांनी शिरूर कासार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने शिरूर कासार पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सादर केलेला चौकशी अहवाल न्यायालयाने स्विकारला आहे.  सुनावणीदरम्यान महेबूब शेख यांचा शपथेवर जवाब नोंदविला असून, प्रथम वर्ग न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी दि.9 डिसेंबर 2022 रोजी चित्रा वाघ यांच्याविरोधात भादंवी 500, 499 अन्वये समन्स जारी केले आहे. या समन्सनुसार आता चित्रा वाघ यांना 8 फेब्रुवारी 2023 ला शिरूर कासार न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment