वेध माझा ऑनलाइन - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील इतर खासदारांसह भोसले पंतप्रधानांना भेटले. पण, यावेळी भाजपबाबत उदयनराजे भोसले यांनी काहीसा नरमाईचा सूर घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या त्यांच्यावर सगळीकडे चर्चा सुरू आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याबाबत आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रकरणी शुक्रवारी उदयनराजे भोसलेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मात्र, ही भेट वैयक्तिक न होता यावेळी भाजपचे इतरही खासदार उपस्थित होते. नवी दिल्ली येथे भाजप खासदार आणि उदयनराजेंसोबत पंतप्रधान मोदींची बैठक पार पडली. त्यानंतर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत याविषयी भूमिका मांडली. भोसले म्हणाले, राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. त्यानंतर राष्ट्रपती याबाबत गृहमंत्रालयाला पत्र पाठवतील. पंतप्रधान मोदींच्या कार्यालयातही आम्ही पत्र दिलेले आहे. राज्यपालांवर प्रक्रियेनुसार कारवाई होईल, अशी आम्हाला खात्री आहे.मागील काही दिवस राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी राज्यपालांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती.तसेच भाजपच्या उदयनराजे भोसलेंनी ही मागणी लाऊन धरली होती.त्यासाठी त्यांनी रायगड किल्ल्यावर एक सभादेखील घेतली होती.त्यामुळे आगामी काळात राज्यपाल पायउतार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment