Thursday, December 8, 2022

उद्धव ठाकरे व कुटुंबीयांच्या मालमत्तेची प्राथमिक चौकशी सुरू: राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली माहिती...

वेध माझा ऑनलाइन - माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करण्याची याचिका गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.

ही याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळात सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला साडेअकरा कोटी रुपयांचा नफा झाला होता. यावर या याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्रोत काय? असा प्रश्नदेखील विचारण्यात आला आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी व्हावी, अशी मागणी या याचिकेत गौरी भिडेंनी केली आहे.
गौरी भिडे यांच्या या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे,आदित्य आणि तेजस ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मेनेझिस यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.

No comments:

Post a Comment