Tuesday, December 27, 2022

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंत्री देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठाकरे गटाचा आरोप ; देसाई यांची आमदारकी रद्द करा ; ठाकरे गटाची मागणी ;

वेध माझा ऑनलाइन - नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाआघाडीकडून एनआयटी भूखंड विक्री प्रकरणी आरोप करण्यात आला आणि आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. महाबळेश्वर जवळील नावली येथील गट क्रमांक- 24 मधील शेत जमिनीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अवैध बांधकाम केले असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचे बांधकाम असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र,  सातबारा उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. कोणतीही परवानगी न घेता घराचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने शंभूराज देसाई यांच्यावर केला आहे.

निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा शेतजमीन म्हणून उल्लेख आहे, परंतु प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम केलेले आहे. सदरील जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये येत असल्यामुळे बांधकामास परवानगी नाही, ही बाब ठाकरे गटाने समोर आणली आहे. विशेष म्हणजे ही जमीन ही स्वतः शंभूराज देसाई यांच्या नावावर आहे. स्वतः लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनीच अतिक्रमण तथा अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होतंय याकडे सातारा जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


No comments:

Post a Comment