वेध माझा ऑनलाइन - गुजरात विधानसभेचा निकाल भाजपासाठी ऐतिहासिक असाच ठरला असून भाजपाने सर्व जुने विक्रम मोडून तब्बल १५७ जागांवर विजय मिळवला आहे. मतांच्या टक्केवारीचेही जुने विक्रम मोडत भाजपने तब्बल ५३ टक्के मतं मिळवली आहेत. भाजपाला मिळालेल्या या मोठ्या विजयानंतर राजकीय विश्लेषकांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही भाजपाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं नव्हतं. तसेच काँग्रेसला या निवडणुकीत फक्त १६ जागा तर आम आदमी पक्षाला आतापर्यंत केवळ ५ जागांवर विजय मिळवता आला.
हिमाचल प्रदेशात सत्ता कायम राखण्यास भाजपाला अपयश आले. हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीमध्ये सुरुवातीला काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू होती. मात्र मतमोजणीच्या उत्तरार्धामध्ये काँग्रेसने आपली आघाडी वाढवत नेली. तर भाजपा पिछाडीवर पडत गेला. सध्याच्या कलांनुसार काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा २५ जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्षांनी ०३ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
गुजरात आणि हिमाचल निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नागरिकांचे आभार मानले आहेत. गुजरातच्या यंदाच्या निवडणुकीत खूप अभूतपुर्व यश मिळाले. या निकालाने मी भारावून गेलो. लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला आणि त्याचवेळी विकासाची ही गती आणखी वेगाने सुरू राहावी, अशी इच्छा व्यक्त केली. मी गुजरातच्या जनशक्तीला नमन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हिमाचल प्रदेशातील जनतेने भाजपला दिलेल्या स्नेह आणि समर्थनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
दरम्यान, २०१७च्या गुजरात निवडणुकीत भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही थोडं दुर्लक्ष झालं होतं. २०१७मध्ये भाजपाला ९९ जागांवर समाधान मानावे लागले. जवळपास १६ जागा भाजपाने गमावल्या होत्या. तर काँग्रेसने मुसंडी मारत ७७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यंदा म्हणजेच २०२२च्या निवडणुकीत भाजपासह नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी लक्ष केंद्रीत करत विजयासाठी रणनिती ठरवली होती. आणि ती यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे
No comments:
Post a Comment