Tuesday, December 27, 2022

वेध माझा ऑनलाइन - कराड नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांविरोधात सबळ पुरावे देवूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई न झाल्यास दि. 30 रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

या उपोषणामध्ये राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला, कराड तालुकाध्यक्ष सचिन भिसे, पाटण तालुकाध्यक्ष योगेश धुपटे यांनी सहभाग घेतला आहे.यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड पालिकेतील मुख्याधिकारी, आरोग्य कर्मचारी, बांधकाम विभाग, लेखा विभागातील कर्मचारी यांच्याविरोधात कागदोपत्री पुरावे, नियमानुसार चौकशीला दिले होते. तरीही प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी पुराव्यांकडे दुर्लक्ष करून संबंधितांना कायदेशीर कारवाईपासून वाचवले आहे. कराड येथील शाळा  क्रमांक 3 चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी आणि नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन जगताप यांच्या शाळेतील कारभाराबाबत यापूर्वी वेळोवेळी निवेदने देवून कारवाई केली नाही. कराड पालिकेचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके व जिल्हा प्रशासन अधिकारी बापट यानी त्याना वाचवल्याचे दिसत आहे. अकाउंट विभागाचे रवी ढोणे यांच्या कामाच्या चौकशीचे निवेदन, स्वच्छ सर्वेक्षणात बालकामगारांचा वापर यासाठीचे तक्रार अर्ज, बांधकाम अभियंता एम. एच. पाटील यांच्या कारभाराबाबतचे पत्र यावरही कराडच्या मुख्याधिकारी यांनी कारवाई केलेली नाही. याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांना पत्र दिले तरी त्यांनीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुरावे देवूनही कारवाईस टाळाटाळ करणार्‍यांची चौकशी करून त्यांचे खातेनिहाय निलंबन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई न झाल्यास दि. 30 रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला असून याबाबतची सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment