वेध माझा ऑनलाइन - अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष 2012 मध्ये जन्माला आला. दोन आठवड्यानंतर हा पक्ष दहा वर्षांचा होईल आणि आपला दहावा वर्धापनदिन आप राष्ट्रीय पक्ष म्हणून साजरा करेल. आज गुजरातच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर आप च्या नेत्यांनी दिल्लीत एकच जल्लोष केला. आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार असल्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा हा जल्लोष होता. मग, प्रश्न असा आहे की कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल तर खालीलपैकी एका अटीची पुर्तता करावी लागते
राष्ट्रीय पक्ष कसा ठरतो?
तीन वेगवेगळ्या राज्यांमधून लोकसभेतील किमान दोन टक्के जागा जिंकलेल्या असाव्यात. त्याशिवाय लोकसभेत कमीत कमी चार खासदार असावेत. चार राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांत किमान सहा टक्के मतं असावीत. किमान चार राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा.
दिल्ली, गोवा आणि पंजाब मध्ये आप ला राज्य पक्षाच्या दर्जाची कामगिरी जमली होतीच. दिल्ली विधानसभा 2020 निवडणुकीत आप पक्षानं 62 जागा जिंकल्या. मतांची टक्केवारी 57 टक्के राहिली. गोवा विधानसभा 2022 मध्ये दोन जागा जिंकल्या. मतांची टक्केवारी सात टक्के होती. पंजाब विधानसभा 2022 मध्ये आप पक्षानं इतिहास रचला. आप पक्षानं 92 जागांवर विजय मिळवला तर मतांची टक्केवारी 42 इतकी होती. आता राज्य पक्षाचा दर्जा गुजरातमध्येही मिळवणं गरजेचं होतं. 13 टक्के मतं मिळवत आपनं ती कामगिरी साध्य केली. आप पक्षाला त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे.
शिक्षण आणि आरोग्यसुविधांना पुढे आणत आप ने भारतीय राजकारणात आपली जागा पक्की केली. भाजपशी दोन हात करताना हळुवारपणे हिंदूत्वाचीही कास धरली. भाजपची बी टीम असे आरोप परतवून लावताना काँग्रेसला पर्याय म्हणून अनेक राज्यांत आप पुढे आली. आता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आपचं पुढचं लक्ष लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येणं, हे असेल. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका व्यक्तीने फक्त एका आंदोलनाचा आधार घेत पक्ष स्थापन करावा, दहा वर्षात दोन राज्यातं, एका महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करावी, लोकसभेवर खासदार पाठवावे आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवावी हे देशाच्या इतिहासात क्वचितच घडलं असावं. देशात सध्या सातच पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आलीय. आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली की झाडू या एकाच चिन्हावर आपला पुढच्या सगळ्या निवडणूका लढता येतील. अशा सगळ्या पातळ्यांवर आम आदमी पक्षानं मतांचा कोटा पूर्ण केलाय. दोन राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. आणि दोन राज्यांमध्ये अपेक्षित मतंही मिळली आहेत. त्यामुळे आता हा पक्ष काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनंतर आठवा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येईल.
No comments:
Post a Comment