Saturday, December 24, 2022

पुन्हा कोविड प्रोटोकॉल पाळा ; चाचण्या वाढवा ; लसीकरण तसेच बूस्टर डोसची व्याप्ती वाढवा ; केंद्राच्या राज्यांना सूचना

वेध माझा ऑनलाइन - चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, चीनमध्ये काही शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर केंद्र सरकाराने राज्यांना सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठीच्या तयारीबाबत चर्चा केली. बैठकीत मनसुख मांडविया यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी सण आणि नवीन वर्षाचे उत्सव लक्षात घेऊन 'टेस्ट-ट्रॅक-ट्रीट आणि लसीकरण' वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. याशिवाय मास्क लावणे, हात स्वच्छ ठेवणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

केंद्राने इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि तीव्र श्वसन आजाराच्या प्रकरणांचे नियमित जिल्हानिहाय निरीक्षण आणि अहवाल देण्यास सांगितले आहे.
आरोग्या मंत्र्यांनी सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी पूर्णपणे तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे, मागच्या वेळी आलेल्या दोन लाटेत जसे काम केले तसंच यावेळीही काम करण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यांना कोविड नियमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात RT-PCR चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे. नवे व्हेरियंट या काळात शोधली जाऊ शकतात, त्यामुळे जास्तीत जास्त केसेसचे चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लसीकरण वाढवण्यासाठी राज्यांना जनजागृती मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय बूस्टर डोसची व्याप्ती वाढवण्यासही सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment