Monday, December 12, 2022

शाईफेक प्रकरणातील कारवाया मागे घेण्याच्या चंद्रकांतदादांनी दिल्या सूचना

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाईफेक प्रकरणातील कारवाया मागे घेण्याच्या सूचना केल्या आहे. प्रसिद्धीपत्र काढत त्यांनी या सूचना केल्या आहेत. 

'सगळ्यांच्या कारवाया मागे घ्या'
घडलेल्या प्रकरणात कोणाविषयी काहीही तक्रार नाही. ज्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले, पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवरची निलंबनाची कारवाई केली होती आणि ज्या पत्रकारावरदेखील कारवाई करण्यात आली त्या सगळ्यांवरच्या कारवाया मागे घ्याव्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. तोंडावर शाईफेक झालेल्या प्रकरणावर काहीही मत नाही. या वादावर पडदा टाकत आहे. त्यामुळे हा वाद थांबवावा, अशीदेखील विनंती त्यांनी केली आहे. 

'पुन्हा एकदा माफी मागतो'
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मी कायम मान राखत आलो आहेत. त्यांच्या कार्याचं अनुकरण केलं आहे. त्यांच्याविषयी मनापासून आदर आहे. त्यांच्या विषयी बोलताना भाषणात बोली भाषेतील शब्द अनावधानाने निघाले. यात कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. घडलेल्या या प्रकाराबाबत या आधीही दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र त्यावरुन घडलेल्या घटना मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले याचं वाईट वाटत आहे. याच मुद्द्यांवरुन महाराष्ट्र अशांत होऊ नये. या सगळ्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment