वेध माझा ऑनलाइन। उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या हस्ते 'माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रा' शुभारंभ होणार आहे. यात्रा कार्यक्रमाच्या ठिकाणी जो बॅनर लावण्यात आलेला आहे. त्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्या बॅनरवर शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. सध्या पारनेरमधील हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
फुलांच्या पायघड्या, रांगोळ्यांचा सडा; पारनेरमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत
उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या स्वागताची पारनेरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती. पारनेरच्या हंगा इथं अजित पवारांच आगमन झालं आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला. सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. हंगा गावात भव्य रांगोळीच्या माध्यमातून घड्याळाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तसेच, फुलांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या.
विधानसभा अध्यक्षांवर गंभीर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत गंभीर शब्दांत ताशेरी ओढले. अध्यक्षांचं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही, असं म्हणत सरन्यायाधीश विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रचंड नाराज झाले होते. फक्त वेळकाढूपणाचं धोरण अध्यक्ष राबवत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. तर राहुल नार्वेकरांना स्पष्ट शब्दांत आदेश देण्यात आले आहेत की, मंगळवारी (17 ऑक्टोबर) विधानसभा अध्यक्षांनी नवं वेळापत्रक सादर करावं. जर निश्चित वेळापत्रक अध्यक्षांकडून येऊ शकलं नाहीतर मात्र नाईलाजास्तव सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट टाईमलाईन आखून द्यावी लागेल. दोन महिन्यांची टाईमलाईन असून शकते, ज्यामध्ये अध्यक्षांना बंधनकारक असेल, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं.
निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अर्थातच अध्यक्षांकडे आहेत. परंतु, 11 मे रोजी या संपूर्ण प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आणि अपात्रतेचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अध्यक्षांकडे सोपवले होते, याला तब्बल पाच महिने उलटून गेले आहेत. परंतु, पाच महिन्यांनंतरही अपात्रतेची सुनावणी वेगानं पुढे का जात नाही? याबाबत ताशेरे ओढत आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत कडत शब्दांत विधानसभा अध्यक्षांना सुनावलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी पार पडली. याच सुनावणीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढलेत. अशातच आता या सुनावणीनंतर अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो झळकल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
No comments:
Post a Comment