वेध माझा ऑनलाईन। येत्या 10 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांच्या पक्षांतराचा निर्णय होईल. त्यानंतर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी गोटासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार नाही. कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार येत्या 10 ऑगस्टपर्यंत शिंदे यांच्या पक्षांतराचा निर्णय होईल. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप पक्षश्रेष्ठींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही आकलन केले आहे. त्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल. विशेष म्हणजे वापरा व फेकून द्या ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही काम झाल्यानंतर बाजूला फेकले जाईल.
पक्षांतरासाठी आर्थिक प्रलोभने दिली गेली का?
निधी वाटपाच्या मुद्यावरून अजित पवार पुन्हा एकदा विरोधकांच्या रडारवर आले आहेत. याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांना छेडले असता, ते म्हणाले की, शिवसेना व राष्ट्रवादीत पक्षांतर झाले. त्यात काही मोठे आकडे समोर आले. काही रोखीचे विषय झाले. पक्षांतर केलेल्या आमदारांना 25 ते 50 कोटी अगदी 150 कोटींचा निधी देण्यात आला. ही आश्वासन पूर्ती आहे का? पक्षांतर करण्यासाठी आर्थिक प्रलोभने दिली गेली का? राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना झुकत माप दिले गेले का? हे आताच सांगता येत नाही.
चव्हाणांची भाकिते ठरली खरी
गत काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारणाविषयी व्यक्त केलेले अनेक अंदाज खरे ठरलेत. त्यातच त्यांनी आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा केल्यामुळे एकनाथ शिंदे यांची सुट्टी होणार का? अशी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांकडून वाढलेल्या दिल्ली वाऱ्यांमुळेही या चर्चेत अधिकची भर पडत आहे.
No comments:
Post a Comment