Sunday, July 23, 2023

गेल्या चार वर्षात राज्यातील १६ जिल्ह्यात ३७ हजार हुन अधिक बालकांचा कुपोषणाने मृत्यू ; राज्याच्या महिला व बालविकास विभागाने दिली माहिती

वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्र हे पुरोगामी आणि विकसित राज्य असल्याचा डंका वाजवला जात असताना, राज्यात कुपोषणाचा राक्षस अक्राळविक्राळ रूप घेत चालला आहे. गेल्या चार वर्षात राज्यातील १६ जिल्ह्यात ३७ हजार २९२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. अशी माहिती दस्तुरखुद्द महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी तारांकित प्रश्नोत्तरे दरम्यान दिली. याबाबतचा प्रश्न आमदार विलास पोतनीस, मनीषा कायंदे आदींनी उपस्थित केला होता.

राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात २०१९ ते २०२२ या काळात कुपोषणाने ६ हजार ५८२ बालकांचा मृत्यू झाला असून, १ लाख ३६ हजार ७३३ मुलांमध्ये तीव्र आणि अतितीव्र कुपोषा अधलून आले असून त्यापैकी १५ हजार २५३ मातांचे बालविवाह झाले असल्याची व २०२२ – २३ च्या अहवालानुसार केवळ नंदुरबार जिल्ह्यात सुमारे २४००० बालके कुपोषित असल्याची बाब निदर्शनास आली हे खरे आहे का, असा सवाल पोतनीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना तटकरे यांनी ही माहिती दिली.

आरोग्य विभागाकडून ६ जुलै २०२३ रोजी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील आदिवासी बहुल १६ जिल्ह्यांची २०१९ ते २०२३ या चार वर्षाची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे. त्यानुसार २०१९ – २० मध्ये ९८१९, २०२०- २१ मध्ये ८९९०, २०२१ – २२ मध्ये ९०२४ तर २०२२ – २३ मध्ये ९४५९ अशा एकूण ३७ हजार २९२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.

आदिवासी जिल्ह्यातील जी बालके आढळून आली आहेत, त्यांच्या मातांच्या विवाहा संबंधी त्या त्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांमार्फत एप्रिल २०२२ मध्ये सर्वेक्षण करून घेण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणात १५ हजार २५३ बाल विवाह झाल्याचे आढळून आले आहे. मार्च २०२३ मधील मासिक प्रगती अहवालानुसार कोकणातील( मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत) ११ हजार ५२८ बालके कुपोषित असल्याची माहिती या विभागाने दिली आहे.

No comments:

Post a Comment