वेध माझा ऑनलाईन। गेल्या वर्षी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. शिंदे-ठाकरे वादात शिवसेना कुणाची आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. त्यात निवडणूक आयोगाने कागदपत्राच्या आधारे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची कोंडी झाली. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह तात्पुरते वापरण्यास दिले होते. मात्र या मशाल चिन्हावरही समता पार्टीने आक्षेप घेतला.
मशाल चिन्ह ही आमची निशाणी असून ती उद्धव ठाकरेंना देऊ नये अशी मागणी समता पार्टीने केली होती. त्याबाबत निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. धगधगती मशाल हे चिन्ह दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीचे आहे. १९९६ पासून हे चिन्ह समता पार्टीकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी दिल्ली हायकोर्टात समता पार्टीने ही याचिका केली होती. परंतु दिल्ली हायकोर्टाने ती याचिका फेटाळली त्यानंतर समता पार्टीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
मशाल चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. या सुनावणीत नेमके काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांचे म्हणणं मांडताना सांगितले की, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह दिले होते. पण ते अंतिम नाही. पोटनिवडणुकीनंतर चिन्हाचा पुर्नवाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो असं उत्तर समता पार्टीला देण्यात आले होते. परंतु अद्याप काहीही निर्णय न झाल्याने समता पार्टीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
.
No comments:
Post a Comment