Tuesday, July 25, 2023

जयंत पाटील यांना 500 कोटी निधी मिळाला... हा बार फुसका ; सभागृहात जयंत पाटलांनी सांगितला खरा आकडा ;

वेध माझा ऑनलाईन। अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्याव्दारे अनेक आमदारांना निधी वाटप केल्यानंतर विरोधकांनी निधीच्या वाटपावरुन दोन्ही सभागृहात आवाज उठवला आहे. अशातच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांना ५८० कोटी रुपये निधी देण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर जयंत पाटलांनी सभागृहासमोर हा आकडा खोटा असल्याची माहिती दिली आहे.

अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी शिवसेना आमदारांना कमी निधी दिल्याचे सांगत शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर बरोबर एक वर्षांनी अजित पवारच या सरकारमध्ये सहभागी झाले असून त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार या सरकारध्ये मंत्री झाल्यानंतर पुरवणी मागण्यांचे विधेयक त्यांनी सभागृहत मांडले आहे. या विधेयकात अनेक आमदारांना कोट्यवधींचा निधी दिला असून काही आमदारांना शुन्य रुपये निधी दिल्याचे काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात सांगितले होते. दरम्यान ज्या आमदारांना कोट्यवधी रुपयाचा निधी मिळाला आहे त्यांची नावे आणि मिळालेल्या निधीची आकडेवारी माध्यमांध्ये येऊ लागली. राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या आमदारांना देखील मोठा निधी मिळाल्याची आकडेवारी यामध्ये माध्यमांनी दिली.

राष्टवादीचे आमदार जयंत पाटील यांना तब्बल 580 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आल्यानंतर जयंत पाटील यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली. जयंत पाटील यांनी सांगितले की, मला 580 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे वृत्त मी वाचले. मात्र मला इतका निधी मिळालेला नाही. आणि तेवढा निधी मिळावा म्हणून मी कोणाला पत्र देखील दिलेले नाही. तसेच या निधीचे जे आकडे आहेत ते खरे आहेत असे मला वाटत नाही असे देखील ते म्हणाले

जयंत पाटील म्हणाले, एवढा निधी माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाही. मला 20 ते 22 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. ते म्हणाले, मी व्हाईट बूक तपासले तेव्हा त्यात मला इतक्या मोठ्या रकमेचा निधी मिळाल्याचे दिसले नाही. त्यामुळे कोणाचा गैरसमज होऊ नये. असे सांगत आपल्याला 20 ते 22 कोटींचा निधी मिळाल्याचे जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले.

No comments:

Post a Comment