वेध माझा ऑनलाईन। अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. यानंतर ज्येष्ठ नेत्यांसह अनेक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला. असं असलं तरी काही आमदार तटस्थ भूमिकेत होते. यापैकीच एक म्हणजे नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अखेर कुणाला पाठिंबा देणार याबाबत भूमिका स्पष्ट केली. सरोज अहिरे यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या स्वागताला उपस्थित रहात त्यांना पाठिंबा जाहीर केला.
सरोज अहिरे म्हणाल्या, “माझी तब्येत खराब होती, मात्र आता बरं वाटतं आहे. मी आज अजित पवारांच्या स्वागतासाठी बाहेर पडले आहे. याचा अर्थ असाच आहे की, मी माझ्या देवळाली मतदारसंघाच्या वतीने अजित पवारांना पाठिंबा जाहीर करत आहे. हॉस्पिटलमध्ये असताना माझी फोनद्वारे सर्वांशी चर्चा झाली आहे.
विकासाबरोबर जायला हवं.”
“देवळाली मतदारसंघाचा पूर्ण विकास करण्यासाठी सत्तेबरोबर जा, असा सर्वांचा आग्रह होता. एकलहरा प्रकल्पासह इतर जनतेचे प्रश्न आणि राहिलेली कामं पुढील एक ते दीड वर्षात करण्यासाठी सत्तेबरोबर, अजित पवारांबरोबर राहा हा जनतेचा आग्रह आहे,” असं सरोज अहिरेंनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे सरोज अहिरे यांना भेटून गेल्या. यानंतरही आज अहिरे यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. याबाबत विचारलं असता सरोज अहिरे म्हणाल्या, “याआधी सुप्रिया सुळे मला भेटायला आल्या होत्या तेव्हा केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा आमची एक शब्दही राजकीय चर्चा झाली नव्हती.”
No comments:
Post a Comment