Wednesday, July 19, 2023

उद्धव ठाकरे, अजित पवारांना जाऊन भेटले अचानक भेटीने राज्यभर चर्चेला उधाण ;

वेध माझा ऑनलाईन। माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार असलेले उद्धव ठाकरे हे राज्यात सत्तान्तर झाल्यापासून अधिवेशनात फारसे फिरकत नाहीत. पण आज (१९ जुलै) विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अन्य शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते. ही भेट नक्की कशासाठी होती, याचे तपशील अद्याप उपलब्ध झाले नसले तरी ठाकरे यांच्या पवार भेटीने राजकीय चर्चाना आता उत आला आहे. ‘अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहे. विधान भवनात आल्याने त्यांची भेट घेतली, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, महा विकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तर अजित पवार हे याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. या दोघांमध्ये कधीही विसंवाद झाल्याचे पहायला मिळाले नाही. करोंना काळात उद्धव ठाकरे घरातून सरकार चालवत असताना, अजित पवार मात्र सकाळी आठ वाजता आपल्या कार्यालयात हजर राहून कामे करत होते. महाविकास आघाडीने सध्याच्या सरकारविरोधात राज्यातील विविध जिल्ह्यात घेतलेल्या सभेतही अजित पवार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर स्टेजवर बसलेले अनेकांनी पहिले होते. अजित पवार यांनी महाविकास आघाडीत असताना शिवसेना संपवायला घेतली. पण उद्धव ठाकरे यांचे त्याकडे लक्ष नव्हते, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदार मंडळींनी केला. शिवाय, अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना विकास निधीची खिरापत वाटली, असा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता.

No comments:

Post a Comment