Monday, July 31, 2023

नरेंद्र मोदीं पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्या मोदींचा सन्मान पवार करतात हे लोकांना आवडल नाही ; शरद पवारांच्या असल्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची सामनातून टीका ;

वेध माझा ऑनलाईन।  नरेंद्र मोदी कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट मानत होते, ते मोदींचा सन्मान करतील. याचा अर्थ मोदी आणि त्यांच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटेच आहेत. फक्त पक्ष फोडण्यासाठीच त्यांनी हे आरोप केले आणि लोकांमध्ये भय निर्माण केले. दुसरे आश्चर्य म्हणजे शरद पवार, महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, पक्ष फोडला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार मोदींचे आगत स्वागत करणार हे लोकांना आवडले नाही. शरद पवार गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती अशा शब्दात सामना अग्रलेखातून खोचक बाण सोडले आहेत.

सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की, खरेतर, लोकांच्या मनात आपल्या विषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती. तिनेक महिन्यापूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल असं पवार म्हणतात. पण पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा पक्ष फोडून भाजपामध्ये सामावून घेतला. त्याचा निषेध म्हणून शरद पवारांनी गैरहजर राहायला हवे होते असं त्यांनी सांगितले.

सामनात आणखी म्हटलंय...
शरद पवार मऱ्हाटे आहेत, शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असं ते स्वत:च सांगत असतात तेव्हा त्यांच्याकडून वेगळ्याच आशादायी भूमिकेची अपेक्षा आहे. देशातील हुकुमशाहीविरोधात इंडिया आक्रमक आघाडी तयार झालीय. शरद पवार हे त्या आघाडीतले महत्त्वाचे शिलेदार आहेत.

मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खतम करून सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे. हे हुकुमशाही विधेयक आणणारे मोदी हे स्वातंत्र्याचे सेनानी लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार घेतील व शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही.देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशावेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. 

No comments:

Post a Comment