वेध माझा ऑनलाईन। राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पदत्याग करत २ जुलै रोजी राज्यातील शिवसेना- भाजपमध्ये सहभागी झाले. पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्या आठ सहकार्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे वर्षभरापासून सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपकडील काही मंत्रालय ही पवार आणि त्यांच्या सहकार्यांकडे द्यावी लागणार आहेत. यासोबतच काही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदही द्यावी लागणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्यातही तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे निधी वाटपात भेदभाव करत असल्याने महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंद यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप सोबत वर्षभरापुर्वी सत्तेत आली आहे. परंतू आता अजित पवार हे देखिल सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटातील आमदारांची गोची झाली आहे. पवार यांनी पुन्हा अर्थमंत्री पदाचा आग्रह धरल्याने तसेच रायगड, पुणे, नाशिक सारख्या मोठ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरही दावा सांगितल्याने तीनही पक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. यावरूनच मंत्री मंडळ विस्तार होउनही अद्याप मंत्रालयांचे वाटप करणे शक्य झालेले नाही. तसेच मंत्री मंडळातील रिक्त पदांचावरही अद्याप वर्णी लागलेली नाही.
शिंदे गटामध्ये मंत्रीपदावरून रस्सीखेच आहे. यावरून दोन इच्छुकांमध्ये शिंदे यांच्या उपस्थितीतील बैठकीतच बाचाबाची झाली आहे. तसेच मंत्री पदासोबतच रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी देखिल शिंदे गटातील भरत गोगावले इच्छुक आहेत. नेमके हे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष सुनिल तटकरे यांची कन्या आदीती तटकरे यांना मिळावे यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. अशातच भाजपने शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांच्यासह काहींच्या कामकाजावर आक्षेप घेत त्यांना बदलण्याची मागणी केली आहे. यामुळे तिढा अधिकच वाढला आहे. १७ जुलैपासून होणार्या विधी मंडळ अधिवेशनापुर्वी संपुर्ण मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप करण्यासाठी तीन्ही पक्षांचे प्रमुख प्रयत्नशील असून स्थानीक पातळीवर हा तिढा सुटलेला नाही. मात्र, हा तिढा सुटल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेच्या काही मंत्र्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये सध्या तीन कॅबीनेट मंत्री आहेत. परंतू उपमुख्यमंत्रीपद अजित पवार
यांच्याकडे गेल्याने पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच राहाण्याची दाट शक्यता आहे.
याचा फटका भाजपचे माजी प्रदेशअध्यक्ष आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
यांना बसणार असून त्यांच्याकडील पालकमंत्री पद जाण्याची शक्यता आहे.
एकाच जिल्ह्यात मोठ्या संख्येने मंत्रीपदे देणे शक्य नसल्याने मंत्रीपदाची आस लावून बसलेले भाजपचे ज्येष्ठ आमदार माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांच्या पदरी निराशा येण्याची चिन्हे आहेत. तानाजी सावंत हे उस्मानाबादचे असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र पुणे राहीले आहे. त्यांचे मंत्रीपद गेल्यास शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकार्यांच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment