Monday, June 12, 2023

50 लाखाची फसवणुक ! ; कराड शहरासह तालुक्यात खळबळ ; काय आहे बातमी ...

वेध माझा ऑनलाइन । प्राईमबुल्स मल्टीकॉन कंपनीत पैसे गुंतवल्यास प्रति महिना चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांची सुमारे 50 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 22 ते मे 23 या कालावधीमध्ये ही घटना घडली आहे. यामुळे कराडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात खळबळ उडाली आहे
हणमंत भगवान लोखंडे (रा. बहे-तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली), प्रमोद बाळू लोंढे (रा. मुंढे, ता. कराड) व प्रकाश सदाशिव नायकवडी (रा. विंग, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शहाजी गणपती पाटील (रा. बहे-तांबवे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की,शहाजी पाटील यांना गावातीलच हणमंत लोखंडे याने तुमच्याकडे काही रक्कम असेल तर तुम्हाला चार टक्के परतावा देतो. मी प्राईमबुल्स मल्टीकॉन या कंपनीत डायरेक्टर पदावर आहे. तुम्ही जी रक्कम गुंतवणार त्याचे मला दोन टक्के कंपनीकडून कमिशन मिळते व तुम्हाला चार टक्के परतावा मिळणार आहे.तसेच तुमच्याकडे आत्ता पैसे नसतील तर तुम्ही कर्ज काढून पैसे भरा फायदा मिळेल. तसेच सदर रकमेचे एक वर्षानंतरचे चेक तुम्हाला देणार असल्याने मूळ रकमेची पूर्ण खात्री आहे,असे सांगितले. त्यानंतर लोखंडे हा शहाजी पाटील यांना घेऊन मलकापूर तालुका कराड येथील कृष्णा हॉस्पिटलसमोर असलेल्या प्राईमबुल्स मल्टीकॉन कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला‌‌. तेथे शहाजी पाटील यांची प्रमोद लोंढे व प्रकाश गायकवाड यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी त्यांनीही शहाजी पाटील यांना तुम्हाला चार टक्के परतावा मिळेल निर्धास्त रहा, असे सांगितले. शहाजी पाटील यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पाच लाख रुपये कर्ज काढून त्यातील दोन लाख दहा हजार रुपये प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर पाठवले. त्यावेळी लोखंडे याने सदर रकमेचा प्रमोद लोंढे यांच्या अकाउंटचा चेक शहाजी पाटील यांना दिला. पुन्हा शहाजी पाटील यांनी पत्नी राजश्री पाटील हिच्या नावावर तीन लाख 80 हजार रुपये कर्ज काढले व ती सर्व रक्कम प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर पाठवली. त्याही रकमेचा चेक लोखंडे याने पाटील यांना दिला. तसेच या रकमेचे चार ते पाच हप्ते पाच टक्के परताव्याने शहाजी पाटील यांच्या बँक खात्यावर जमा केले. 

मात्र आॅक्टोबर 2022 पासून परतावा मिळणे बंद झाले. त्यामुळे शहाजी पाटील यांनी लोखंडे, लोंढे व गायकवाड यांना याबाबत विचारणा केली असता मार्केट डाऊन आहे नंतर पैसे मिळतील सहा महिने थांबा असे सांगण्यास सुरुवात केली. एक वेळ शहाजी पाटील यांनी मलकापूर येथे ऑफिसमध्ये जाऊन संबंधितांची भेट घेतली. त्यावेळीही त्यांनी काळजी करू नका तुम्हाला तुमच्या रकमेचा परतावा मिळेल असे सांगितले. त्यानंतर शहाजी पाटील यांनी जानेवारी 2023 मध्ये त्यांना दिलेला चेक वटविण्यासाठी बँकेत गेले असता प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर रक्कम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment