वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अलिबागमध्ये असलेल्या 19 बेकायदा बंगल्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अलिबागमध्ये 19 बंगले असल्याचा आरोप केला होता. यासदंर्भात एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्यांनी सूचक इशारा दिला आहे.
मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले, मालमत्ता रश्मी ठाकरे यांच्या नावावर आहे. चौकशी सुरु आहे. यामध्ये गुन्हा दाखल झाला असून लवकरच आरोपपत्र दाखल होईल असे फडणवीस यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांना रश्मी ठाकरे यांची चौकशी का होत नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आवश्यकता नाही. तसेच चौकशी कुणाची करावी आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही तर पोलीस ठरवत असतात. कोणाची चौकशी करायची हे पोलिसांना ठरवायचे आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सरकार यामध्ये हस्तक्षेप करत नाही जसे उद्धव ठाकरे करत होते. जर आम्ही यामध्ये हस्तक्षेप केला तर सिस्टीम नीट चालणार नाही. ज्याची चौकशी करायची आहे ती पोलीस करतील. मी एवढेच सांगेन की कोणतेही प्रकरण असो, आम्ही त्यावर कारवाई करु, कोणालाही सोडणार नाही. कोणी चुकीचे केले असेल तर कारवाई होणार, असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
No comments:
Post a Comment