Wednesday, June 14, 2023

अधिकार गाजवून जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न करू नका, तो हाणून पाडू ; उदयनराजेंचा इशारा...

वेध माझा ऑनलाईन । शिवप्रभुंचा सातरस्ता पोवईनाका येथे असलेले पूर्णाकृती पुतळारुपी शिवस्मारक सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे.शिवप्रभुंपेक्षा दिग्गज किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणीही धाडस करु नये. अधिकार गाजवून,जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हिन प्रकार करत असेल तर तो जनतेच्या माध्यमातून हाणून  पाडला जाईल असा थेट इशाराच खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. फेसबूक पोस्ट करून त्यांनी हा इशारा दिला आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहीले की, “सातरस्ता म्हणून ओळखला जाणारा पोवईनाका परिसर हे सातारा शहराचे नाक आहे. याठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे स्मारक आहे.या स्मारकाचे सध्या सर्वांच्या सहकार्याने आणि नगरपरिषदेच्या माध्यमातुन चांगले सुशोभिकरण होत आहे. सातारकरांनाच नव्हे तर येथून जाणा-या-येणा-या सर्वांनाच हा शिवस्मारक परिसर प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणास्थानाच्या ठिकाणी अन्य काही महापुरुषांचे स्मारक किंवा आईसलॅन्ड करण्याचे कोणी घाट घालत असेल तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल.स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभुंचे कर्तुत्व झाकाळले जाईल. 

असे काही कोणी करण्याचा प्रयत्न जरी केला तर ते प्रयत्न हाणून पाडले जातील. लोककल्याणकारी शिवप्रभुंची तुलना अन्य कोणाशी होवू शकणार नाही आणि तसा प्रयत्न देखील कोणी करु नये अशी माफक अपेक्षा आहे,”असे सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment