Saturday, June 10, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे ; अजित पवार नाराज !, संबंधित बैठकीला अजित पवार राहिले अनुपस्थित ; रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया ;

वेध माझा ऑनलाइन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २४ वा वर्धापन दिन पार पडला. वर्धापन दिनाचं औचित्य साधत एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संबंधित बैठकीला अजित पवार उपस्थित नसल्याने ही चर्चा सुरू झाली.

या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच ही घोषणा केली. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महत्त्वाचं आणि संविधानिक पद आहे. अजित पवार महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. अशा स्थितीत त्यांच्याकडे पक्षाचं एखादं पद दिलं तर तो अन्याय ठरला असता, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बैठकीतील अनुपस्थितीनंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं, याबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “अजित पवार हे नेहमी-नेहमी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नाहीत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदानंतर ‘विरोधी पक्षनेते’ हे पद सर्वात महत्त्वाचं पद आहे. ते पद आता अजित पवारांकडे आहे. आमदार म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती मंत्री असते, मंत्री असतानाच त्यांच्याकडे पक्षाचं एखादं पद असेल, तर राज्यावर किंवा पक्षावर अन्याय होत असतो. त्याचप्रमाणे अजित पवारांकडे आता विरोधी पक्षनेतेपद आहे. अशा स्थितीत त्यांना पुन्हा पक्षाचं एखादं पद दिलं असतं, तर कुठे ना कुठे अन्याय झाला असता. अजित पवार हे महाराष्ट्रातील तमाम सामान्य माणसांचे प्रश्न मांडत असतात. विरोधी पक्षनेते म्हणून ते हे प्रश्न मांडतात. त्यांचं हे पद अतिशय महत्त्वपूर्ण आणि संविधानिक पद आहे.”

नाराजीच्या चर्चेदरम्यान अजित पवारांनी स्वत: ट्विटरवरून सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह नवीन जबाबदारी मिळालेल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांचं अभिनंदन केलं आहे. 

No comments:

Post a Comment