Thursday, June 15, 2023

'त्या' जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे का नाहीत? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडखळले !

वेध माझा ऑनलाइन । राज्यातील काही दैनिकांना शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीनंतर राज्यापासून ते पार दिल्लीपर्यंत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आजच्या कोल्हापुरात पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच जाहिरातीवरून दांडी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ती जाहिरात शासनाने दिलेली नाही. मात्र लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नाही. माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व सहकारी मंत्री हे सगळ्यांचे श्रेय आहे आणि केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ आमच्या सरकारला दिले आहे त्यामुळेच आम्ही एवढ्या जोमाने काम करू शकलो. अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देत आहोत. हे सर्व प्रकल्प कोट्यवधी लोकांना दिलासा देणारे आहेत. त्यामुळेच लोकांनी खऱ्या शिवसेना भाजप सरकारला पसंती दिलेली आहे. 

आणि मुख्यमंत्री अडखळले!
सीएम एकनाथ शिंदे यांना जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे का नाहीत? असे विचारले असता त्यांना थेट उत्तर देता आले नाही. ते काही काळ अडखळल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, हा जनतेचा मोठेपणा आहे. ती जाहिरात सरकारची नाही. मात्र, त्या जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातील भावना या माध्यमातून दिसून आल्या आहेत. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही. आम्ही आमचे काम करत राहू. आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही. आरोप जेवढे करतील त्यापेक्षा दुपटीने आम्ही काम करू.

No comments:

Post a Comment