Friday, June 30, 2023

अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या पाणीपट्टी वाढीला स्थगिती ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी; शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांची पत्रकाद्वारे माहिती ;

वेध माझा ऑनलाइन। कराड नगरपालिकेने पाणीपट्टी आकारणीमध्ये केलेली वाढ रद्द करावी, याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वाढीव पाणीपट्टीला स्थगिती देण्याचा आदेश नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना बजाविला आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडमधील नागरिकांची वाढीव पाणीपट्टीतून मुक्तता झाली आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे. 

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात बागडी यांनी पुढे म्हटले आहे, की गेल्या आठवड्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दक्षिण मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कराड दक्षिणमधील विविध गावांसह कराड शहराच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला होता. यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी कराड नगरपालिकेच्या वाढीव पाणीपट्टीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. कराड नगरपालिकेने पाणीपट्टी दरात वाढ केल्याने त्याचा नाहक भुर्दंड कराड शहरात राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही वाढीव पाणीपट्टी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे केली होती. 

या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबतचा निर्णय घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी नगरपालिकेने पाणीपट्टीतील आकारणीमध्ये केलेल्या वाढीला स्थगिती द्यावी व जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारावी, असा आदेश बजाविला आहे. याबाबतचे पत्र श्री. बापट यांनी आज कराड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच याकामी नूतन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचेही विशेष सहकार्य लाभले. याबद्दल भाजपा कराड शहरच्यावतीने डॉ. भोसले, ना. फडणवीस व श्री. खंदारे यांचे सर्व शहरवासीयांच्यावतीने आम्ही आभार मानत आहोत, असे श्री. बागडी व माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment