वेध माझा ऑनलाइन । विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेमधील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. याआधी विप्लव बाजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाचे दोन आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादि यांचे संख्याबळ सारखे झाले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.
राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी याबाबत भूमिका स्पष्ट केली. तर आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले पाहिजेत, असे म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एक ने कमी झाली, आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे त्यामुळे राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना धक्का देणार का? अशी चर्चा रंगली आहे.
नरहरी झिरवाळ यांनी बोलताना सांगितले की, विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार आहोत. अमोल मिटकरी आणि नरहरी झिरवाळ यांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेत ठाकरे गटाकडे 10 तर शिंदे गटाकडे एक आमदार होता.तसेच राष्ट्रवादीकडे 9 तर काँग्रेसकडे 8 आमदार असून 5 अपक्ष आमदार आहेत.त्यापैकी किशोर दराडे यांनी ठाकरेंना तर सत्यजीत तांबे यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. दराडे यांनी पाठिंबा बदलला तर मात्र गेम बदलू शकतो.दरम्यान, मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 9 आमदार आहेत.
No comments:
Post a Comment