Wednesday, August 23, 2023

एकनाथ शिंदें मुख्यमंत्री झाल्यापासून अडगळीत पडलेला प्रकल्प पुन्हा उभा करायला अजितदादांचा पुढाकार ! ;

वेध माझा ऑनलाईन। वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. राज्याचे प्रमुख म्हणून महत्वाच्या पदावर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक विचित्र निर्णय घेतला होता. त्यामुळे साधारण २ लाख कोटी रूपयांपेक्षा मोठ्या गुंतवणूक क्षमतेचा एक प्रकल्प अडगळीत जावून पडला होता. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेतला आहे   एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून खोळंबलेला हा प्रकल्प पुन्हा मार्गस्थ लावण्यासाठी अजित पवार यांनी आज बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, पुणे विभागीय आयुक्त व सातारा जिल्हाधिकारी यांना ‘वेळेत’ उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

‘बंगळुरू – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे. ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या काळात हा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी तब्बल ८ हजार एकर जागा निर्धारीत करण्यात आली होती. या जागेचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली होती.

या ठिकाणी प्रकल्प होवू नये म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोध होता. कोरेगावमध्ये प्रकल्प स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न निंबाळकर यांनी केला होता. परंतु त्यावेळी अजित पवार यांनी निंबाळकर यांना दटावले होते, व हा प्रकल्प म्हसवड येथेच होईल असे निक्षून सांगितले होते.

No comments:

Post a Comment