वेध माझा ऑनलाईन। शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच शनिवारी आपल्या बारामती मतदारसंघात दाखल झाले. यावेळी बारामतीकरांनी अजित पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करत अभूतपूर्व स्वागत केलं. या स्वागतानंतर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत तुफान फटकेबाजी केली यावेळी लोकांकडून स्वागत होताना काहीजण हात धरून किस घ्यायचे… बायकोने एवढे किस घेतले नाहीत, तेवढे किस आज घेण्यात आले असे अजित पवारांनी म्हणताच त्याठिकाणी जोरदार हशा पिकला
“ज्या पद्धतीने बारामतीत स्वागत करण्यात आलं, असं कधी मी बघितलं नव्हतं. एवढे माझे वर्गमित्र भेटले की, मी पाहतच राहिलो. माता-भगिनी ओवाळत होत्या. तरूण मुलं-मुली प्रोत्साहन आणि शुभेच्छा देत होते. सगळी बारामतीबाहेर आली होती. अशा प्रकारची मिरवणूक आयुष्यात पाहिली नव्हती,” असं अजित पवार म्हणाले.
“हे एक प्रेम आहे. मी कोणालाही बळजबरी केली नव्हती. लोकांचा उत्साह, प्रेम, आपुलकी मिळत होती. काय तो फुलांचा आणि पाकळ्यांचा पाऊस पडला होता. अशा फुलांच्या पाकळ्या बारामतीतील रस्त्यांनी पाहिल्या नव्हत्या. एवढं ढकला-ढकली आणि रेटा-रेटी आयुष्यात कोणी मला केली नाही,” अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.
“ ठरवलं होतं चिडायचं नाही”
“हातात-हात दिल्यावर लोक ओढायचे… हात ओढले की वाटायचं, हा हात तुटून पडतोय की तो तुटतोय, असं झालं होतं. काही-काही हात धरून किस घ्यायचे… बायकोने एवढे किस घेतले नाहीत, तेवढे किस घेण्यात आले. आरं काय चाललं आहे? पण, आज ठरवलं होतं चिडायचं नाही… सगळ्यांना फक्त नमस्कार करायचा,” असं अजित पवार म्हणाले आणि एकच हशा पिकला.
“एवढ्या प्रकारच्या टोप्या मला घातल्या गेल्या. एक घातली की दुसरी… नंतर तिसरी… आता मला विचार करावा लागेल, किती वाजता कामाला सुरुवात करायची आणि कितीवाजता झोपायचं,” असं अजित पवारांनी म्हटलं.
“तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत १ लाख ६८ हजारांचं मताधिक्य दिलं. समोरच्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त केलं. असं केल्यानंतर मी काय करायचं? त्यामुळे मी पहाटे ५ वाजताच बावचळून उठतोय. कामाला लागतोय. बायको म्हणते दमानं, दमानं घ्या. हे चाललंय काय? जरा वयाचा विचार करा. पण, वय वगैरे काही नसतं. कामामधून वेगळंच समाधान मिळतं,” असं अजित पवारांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment