वेध माझा ऑनलाइन - ठाण्यात इमारतीची टाकी साफ करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी चार जण टाकीत कोसळले. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील नौपाडा येथील मोनालिसा इमारती शेजारी असलेल्या मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीतील पाण्याच्या टाकीत हे चार कामगार पडले.
या ठिकाणी एकूण चार कामगार काम करत होते आणि त्यापैकी 2 कामगारांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे तर 2 कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोन्ही कामगारांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. केमिकलमुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून या 2 कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती देताना नौपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितलं की, मराठा सेवा मंडळाची ही इमारत आहे. या इमारतीतील पाण्याची टाकी साफ करण्याचं कंत्राट एका ठेकेदाराने घेतलं होतं. त्यासाठी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काम सुरू केलं. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी एक केमिकल टाकलं होतं. त्यानंतर टाकी साफ करण्यासाठी दोन कामगार खाली उतरले.
या दोन्ही कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केला. त्यानंतर इतर दोन कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी बचावकार्य केलं. या चार कामगारांपैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर इतर दोन कर्मचाऱ्यांची स्थिती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
पुण्यात शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले, चौघांचा मृत्यू
2 मार्च रोजी पुण्यात अशाच प्रकारची एक घटना घडली होती. शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले. त्यापैकी तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोणी काळभोर येथील हॉटेल प्यासा जवळ असलेल्या परिसरात ही घटना घडली आहे. शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी तरुण आले होते. यावेळी चार तरुण टाकीत पडले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment