वेध माझा ऑनलाइन - औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात एक बैठक झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वपक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
इम्तियाज जलिल यांनी म्हटलं, हे खरं आहे की ते भेटायला आले होते. माझ्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी ते आले होते. त्यावेळी आमच्यात चर्चा सुरू होती. आमच्यावर आरोप होतात की, भाजप जिंकते ते आमच्यामुळे जिंकते. तर मी त्यांना ऑफर दिली की, जर तुम्हाला हे संपुष्टात आणायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? पण त्यावर ते काही बोलले नाहीत. कुणालाही आम्ही नकोयत. फक्त मुस्लिमांची मते पाहिजेत. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही मुस्लिम मते हवी आहेत ना या मग आमच्यासोबत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज जलिल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
या देशात सर्वात जास्त नुकसान जर कोण करत असेल तर ते भाजप आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. उत्तरप्रदेशात सुद्धा समाजवादी पार्टी आणि बसपा सोबत बोलणं केलं होतं. पण त्यांना मतं हवी आहेत आणि ओवैसी साहेब नकोयत, एमआयएम पक्ष नकोय. म्हणून मी त्यांना ऑफर दिली की, चला आपण दोघेही एकत्र येऊन निवडणूक लढवूया असंही इम्तियाज जलिल म्हणाले.
No comments:
Post a Comment