वेध माझा ऑनलाइन - महाविकास आघाडीचे 25 आमदार संपर्कात असून निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येतील, असं म्हणणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. माझ्याकडे अशी माहिती नाही की, रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाहीत, असं म्हणत संजय राऊतांनी दानवेंना कोपरखळी मारली आहे. तसेच, भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच, असंही संजय राऊतांनी सांगतिलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "काल धुळवड होती. लोक धुळवडीला नशा करतात, अशी परंपरा आहे. पण माझ्याकडे अशी माहिती नाही की, रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाहीत. माझे चांगले मित्र आहेत ते. मी त्यांना अनेक वर्ष पाहतोय. दिल्लीत माझ्या बाजूलाच राहतात. त्यांना भांगेची किंवा इतर कोणतीही नशा करण्याची आवश्यकता पडली नाही. तरीपण ते कोणत्या नशेत बोलले काल धुळवडीला ते मला माहीत नाही. ते 25 बोललेत कदाचित त्यांना 175 बोलायचं असेल. की, 175 आमदार महाविकास आघाडीचे आमच्या संपर्कात आहेत. स्लिप ऑफ टंग झाली असेल. घ्या ना, मग थांबलात कशासाठी? या फुसकुल्या कोणासाठी सोडताय?"
"जर मी म्हटलं की, भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच. तर तुम्ही काय म्हणाल? पण आता होळी संपलेली आहे. रात्रीची नशा उतरलेली नसेल. त्यामुळे काल काय बोललो ते त्यांना आता आठवणार नाही.", असं संजय राऊत म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment