वेध माझा ऑनलाइन - अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज देवेद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेचे नेते आणि मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर ईडीकडून टाकण्यात आलेल्या धाडीचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे जेव्हा धाड पडली. पहिल्यांदा 130 कोटी आणि नंतर ती वाढता वाढता 300 कोटींची बेहिशोबी संपत्ती सापडली. दोन वर्षांत 38 संपत्ती त्यांनी जमवल्याचा पूर्ण रेकॉर्ड सापडला आहे. असं प्रशिक्षण घेऊ नका असं प्रशिक्षण घेतल्यास आर्थर रोडमद्ये जावं लागतं. इथं लोक कोरोनामुळे मरत होते आणि तिकडे संपत्ती खरेदी सुरू होती. प्रॉपर्टी खरेदीचा रेटही पाहा 24 महिन्यात 38 प्रॉपर्टीची खरेदी.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीतही सहा हाजर कोटी रुपयांचे 370 प्रस्ताव 30 मिनिटांत मंजूर करुन टाकले. भूमिगत जल भोगदा, मनपा रुग्णालय इमारत बांधकाम, मलनिस्सारण योजनेसाठी पैसे, रुग्णालयातील विविध कामे, अग्निशमन दल वाहन खरेदी, पण हे सर्व करत असताना नाले सफाईचा विषय निघाला नाही. आता पावसाळा येणार आहे आणि शेवटच्या सभेतही नालेसफाईचा विषय आला नाही. पण बांधकामाचे विषय हे मोठ्या प्रमाणात घेण्यात आले.
7 मार्च रोजीचं स्थायी समितीच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज पहा. काय लाईन लागली होती ती.... भयानक होती. आजकाल पेन ड्राईव्ह दिला तर लोकांना राग येतो. पण तुम्हाला हवा असेल तर तिथल्या लागलेल्या लाईनमध्ये कोण-कोण होतं, कोण आत जात होतं कोण बाहेर येत होतं याचा पेन ड्राईव्ह द्यायला मी तयार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पेट्रोल-डिझेलचा कर आपण कर कमी केला नाही. पण दारू वरील कर 50 टक्के केला, बार लायसन्सच्या नुतनीकरणावर 50 टक्के सूट दिली. नव्याने दारू विक्रीचा परवाना दिला. चंद्रपूरची दारू बंदी मागे घेतली. कोरोनाच्या काळात मंदिरे बंद होती आणि मद्यालय सुरू होती. क्लास बंद होती ग्लास सुरू होते. महाराष्ट्र मद्यराष्ट्र करण्याचं जे काम चाललं आहे... या संदर्भात अनेक विषय माझ्याकडे आहेत पण मला असं वाटतं की, एकच मुद्दा मला मांडावा वाटतो की, ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या अनिल अवचट यांना सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी मंत्रिमंडळ बैठकीत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री परवान्याचा निर्णय घेतला असंही फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment