वेध माझा ऑनलाइन - मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. तर दुसरीकडे भाजपने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिक यांचे खाते इतर मंत्र्यांकडे सोपवण्याची तयारी केली आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी नवाब मलिक यांच्या मंत्रालयातील खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
नवाब मलिक यांच्या खात्याची जबाबदारी देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तर कौशल्य विकास विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी भूमिका पवारांनी घेतली आहे.
याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
का घेतला पवारांनी निर्णय?
नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यांना 3 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या खात्यातील काम मागे पडू नये म्हणून त्यांच्या खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकड देण्यात यावी अशी भूमिका पवारांनी घेतली.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. नवाब मलिक उपलब्ध नसल्यानं 2 नवे मुंबई कार्याध्यक्ष दिले जाणार आहे. नरेंद्र राणे आणि राखी जाधव हे नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष असणार आहे. नवाब मलिक यांचा जामीन फेटाळल्यानं त्यांची जबाबदारी तात्पुरती दिली जाणार आहे. त्यांच्या खात्यांची जबाबदारी आणि पालकमंत्रिपद, पदभार इतर मंत्र्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, 'नवे पालकमंत्री म्हणून परभणीसाठी धनंजय मुंडे याचे नाव देण्यात आले आहे. तर गोंदियासाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव दिले आहे, अशी माहिती मिळत आहे
No comments:
Post a Comment