वेध माझा ऑनलाइन - लखनऊ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड यश मिळाले. यानंतर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथबद्ध होणार आहे. दुसऱ्यांदा युपीचा गड राखल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असून, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा मेगा इव्हेंट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी लखनऊच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात १२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि पाच उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्याशिवाय विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आघाडीचे उद्योगपती आणि ४९ कंपन्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचे एन. चंद्रशेखरन, अंबानी ग्रुपचे नीरज अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचाही समावेश असेल.
२०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार
मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी २०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment