Tuesday, March 22, 2022

दैनंदिन वापरात लागणाऱ्या उत्पादनांच्या किमतीत वाढ ; अनेकांचं आर्थिक गणित बिघडलं ; येत्या काळात गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होणार!

वेध माझा ऑनलाईन - मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी 31 मार्च हा केवळ कोणत्याही आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसतो, तर आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक कामं पूर्ण करण्याची अंतिम मुदतही असते. या महिन्यात सर्व जण आपले वर्षभराचे हिशेब पूर्ण करून पुढच्या वर्षातल्या आर्थिक गुंतवणुकीचा प्लॅन करत असतात. मात्र, इतर वर्षांच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात महागाई वाढत असून अनेकांचं शेवटच्या महिन्यातलं आर्थिक गणित फिस्कटलं आहे. 

मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अमूल पराग आणि नंतर मदर डेअरीने दुधाचे दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढवले. मध्य प्रदेशातल्या सांची या कंपनीने दुधाच्या दरात लिटरमागे पाच रुपयांची वाढ केली आहे. दूध हा रोजच्या वापरातला अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.
22 मार्चपासून एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. यामुळे मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये झाली आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर पहिल्यांदाच एलपीजी सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे.
तेल कंपन्यांनी अलीकडेच घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. रेल्वे, राज्य मार्ग परिवहन महामंडळं, बस ट्रान्सपोर्टर्स, मॉल्स आणि संरक्षण क्षेत्रातल्या आस्थापना यांचा घाऊक ग्राहकांमध्ये समावेश होतो. या दरवाढीमुळे येत्या काळात या सर्व घटकांशी संबंधित सेवा महागण्याची भीती आहे.
या महिन्यात नेस्लेने मॅगीच्या छोट्या पॅकची किंमत 12 रुपयांवरून 14 रुपये केली आहे. कंपनीने मॅगीच्या सर्व प्रकारच्या पॅकेट्सच्या किमतीत वाढ केली आहे. यासोबतच कंपनीने चहा, कॉफी आणि दुधाच्या दरातही वाढ केली आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीनेही उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.सर्वसामान्य माणसाला दैनंदिन वापरात लागणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढल्याने अनेकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून येत्या काळात गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

No comments:

Post a Comment