वेध माझा ऑनलाइन - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिर्डीकर आणि साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिर्डीत पारंपारिक पद्धतीने सुवर्णरथाची मिरवणूक निघत रंगपंचमी साजरी होणार आहे.
शिर्डीमध्ये 17 मार्च ते 22 मार्च या दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला होता. गुरुवारच्या पालखीसह रथोत्सवाला स्थगिती देण्यात आली होती. साईभक्त आणि ग्रामस्थांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले.
प्रतिबंधात्मक आदेशात काय?
अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी 14 मार्च 2022 रोजी एक प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता. त्यामध्ये जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटनेवरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलीसांना मदत व्हावी म्हणून 17 मार्च ते 22 मार्च 2022 पर्यंतचे साई मंदिरातील उत्सव, श्रींची गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्ताने निघणारी रथयात्रा मिरवणूक पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
शिर्डीत परिक्रमा सुरू
कोरोनामुळं दोन वर्षांपासून खंडीत झालेली साईपरिक्रमा मागील आठवड्या सुरु झाली. शिर्डीतील साईभक्त आणि ग्रामस्थ या परिक्रमेत सहभागी झाले. आठ वर्षांपूर्वी शिर्डीत साई परिक्रमेला सुरुवात झाली. मात्र कोरोनामुळं गेली दोन वर्षे ही परिक्रमा होऊ शकली नव्हती.
No comments:
Post a Comment