Sunday, March 20, 2022

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला टाळी देण्यासाठी हात पुढे केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ ; शरद पवार काय म्हणाले...?

वेध माझा ऑनलाइन - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला टाळी देण्यासाठी हात पुढे केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनीही एमआयएमसोबत युती करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. अखेर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही  'कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु, ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे' असं म्हणत एमआयएमचा ऑफर धुडकावून  लावली.

राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे इम्तियाज जलील यांच्या घरी गेले असता एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या युतीची उलटसुलट चर्चा रंगली होती. पण, आज या चर्चांना शरद पवारांनी पूर्णविराम दिला.

'कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु, ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही' असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

तसंच, 'राज्याला याबाबत तुम्ही निर्णय घेवू शकता हे जोपर्यंत राष्ट्रीय समितीने स्पष्ट केलं नाही तोपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेवू शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत. तो पक्ष निर्णय नाही' असंही पवारांनी स्पष्ट केलं.

देश एका विचाराने चाललेला आहे. समाजातील सर्व घटक एकत्र आहेत. असं असताना पुन्हा समाजात दुरावा निर्माण होईल असं लिखाण किंवा चित्रपट हे टाळलं पाहिजे. ज्या चित्रपटाबद्दल आता सांगितलं जातंय. त्यामध्ये कळत नकळत कॉंग्रेसवर एक दोष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॉंग्रेसकडे सत्ता असताना हे घडलं आणि तेच याला जबाबदार आहेत असं ध्वनित केलं जातंय, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी काश्मिर फाईल सिनेमावर दिली.

' या सर्व बाबींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. जो कालखंड आहे ज्यामध्ये कश्मीरमध्ये जे काही घडलं जे आता दाखवलं जातंय. त्या कालखंडामध्ये देशाचं नेतृत्व कॉंग्रेसकडे नव्हतं. त्यावेळी विश्वप्रताप सिंग यांच्याकडे होतं. याबाबत आज आवाज उठवणारे भाजपचे लोक विश्वनाथ प्रतापसिंगांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते. त्यानंतर या सर्व काळात देशाचे गृहमंत्री जे होते तेही भाजपच्या पाठबळावरच होते आणि राज्यपाल राजवट होती. फारुक अब्दुल्ला सत्तेतून दूर झाले होते. जे राज्यपाल होते ते कॉंग्रेसच्या विचारांचे नव्हते. त्यामुळे आज हा प्रश्न उचलून पुन्हा सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या संबंध कालखंडामध्ये या सर्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करणारे भाजपचे घटक हे पूर्ण सहभागी होते. त्यामुळे त्यांनी आता कारण नसताना हा विषय काढला हे योग्य नाही' असंही पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment