वेध माझा ऑनलाइन - सक्रिय राजकारणात राहून आपली स्वच्छ प्रतिमा जोपासणे महा-कठीण आहे. व्यापार आणि त्यातही सत्तेचा म्हटले की, देवाण-घेवाण ही आलीच साहजिकच नितीशास्त्राचे सर्व संकेत पायदळी तुडवले जातात गेल्या पन्नास वर्षांचा मागोवा घेता भारतातील राजकारणरुपी महाकाय वृक्षावर अनिष्ट विघातक प्रवृत्तींची असंख्य बांडगुळे वाढलेली दिसून येतात. अलीकडील काळात तर त्यात झपाट्याने वाढ होत आहे. अशा विदारक परिस्थितीतही आदर्श ठरलेल्या नेतृत्वात विकासदूत म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.
“सत्ता माणासाला भ्रष्ट बनविते, अधिक सत्ता माणसाला अधिक भ्रष्ट बनविते” असे हेरॉल्ड लॉसवेल या पाश्चिमात्य विचारवंताने म्हटले आहे. राजकारणात माणसाची जागा बदलली की त्याची भाषाही बदलते. परंतू या दोन्ही गोष्टींना बाबा मात्र अपवाद ठरले आहेत. केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री यासारखी अत्यंत महत्वपूर्ण पदे भूषवूनही बाबांनी त्यांच्यात सत्तेचा वास कधीही येऊ दिला नाही. राजकारणात काही व्यक्तींना पदामुळे महत्व प्राप्त होते, तर काही वेळा संबंधित व्यक्तीमुळे पदाचे महत्व वाढते. अशा व्यक्तीपैकीच पृथ्वीराज बाबा हे एक होत. सूर्यमालेतील अनेक ग्रहांना तेज लाभते ते सूर्यामुळेच. परंतू सूर्य अस्ताला गेला की तेही लोप पावते याचे भान ठेऊन बाबांनी जनमानसातील आपल्या स्वच्छ व निष्कलंक प्रतिमेला प्रयत्नपूर्वक जोपासले आहे. ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ हे त्यांच्या जीवनाचे साधे, सोपे व सरळ सूत्र आहे. आपल्या कार्याची उंची वाढविण्याचा प्रयत्न ते नेहमीच करताना दिसून येतात.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जवळपास 135 वर्षांची परंपरा आहे. नेहरू-गांधी घराण्याने आजपर्यंत या परंपरेची प्रयत्नपूर्वक जोपासना केली आहे. 1962 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पृथ्वीराज बाबांचे वडील आंनदराव चव्हाण यांना शेकाप पक्षातून काँग्रेस पक्षात आणले तेव्हापासून ते आजअखेर काँग्रेस पक्ष व गांधी घराणे यांच्याशी चव्हाण घराणे एकजीव बनून राहिले आहे. किंबहूना राजकारणात गांधी-चव्हाण घराणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये.
1991 मध्ये माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या खास आग्रहास्तव पृथ्वीराजबाबांचा राजकारणात प्रवेश झाला व ते लोकसभेचे खासदार बनले आपल्या पंधरा वर्षाच्या खासदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, पक्षनेतृत्वाने त्यांना पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री म्हणून संधी दिली त्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी त्यांचा स्नेह अधिकच वाढला. डॉ. सिंग यांच्या काळात 2008 मध्ये भारत-अमेरिका यांच्या दरम्यान ऐतिहासिक असा “अणू करार” घडून आला या करारामुळे भारत-अमेरिका संबधाचे नवे:पर्व सुरू झाले. दोन्ही देशांचे संबंध बळकट होण्याच्या दृष्टीने व देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेल्या या अणू करारामध्ये पृथ्वीराजबाबांनी मोलाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय व राज्य पातळीवरील राजकारणात सक्रिय असलेल्या बाबांनी जवळपास पंचवीसहून अधिक देशांना भेटी दिल्या प्रत्येक भेटीत प्रसंगानुरूप अभ्यासपूर्ण मते मांडतानाच देशाची न राज्याची समृध्द परंपरा अबाधित राखत देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.
आ. पृथ्वीराज चव्हाण हे एक शांत, संयमी, नम्र, स्वच्छ व निष्कलंक चारित्र्य, उच्चविभूषित व व्यासंगी नेतृत्व म्हणून देशभर ओळखले जातात. देशाला आजपर्यंत वेळोवळी त्यांच्या प्रगल्भ ज्ञानाचा धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने फायदा झाला आहे. 2010 मध्ये महाराष्ट्रात उद्भवलेल्या राजकीय पेचप्रसंगात काँग्रेस पक्षाची एक गरज म्हणून त्यांच्यावर पडलेली मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली व राष्ट्रीय काँग्रेसचा राज्याचा रथ त्यांनी यशस्वीपणे हाकला.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर तब्बल 50 वर्षांनी पृथ्वीराजबाबांच्या रुपाने कराडला मुख्यमंत्री पदाची सुवर्णसंधी मिळाली. त्या संधीचे अक्षरश: सोने करून दाखवतानाच सातारा जिल्हा व कराडकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
राज्याचा गाडा हाकतानाच सातारा जिल्हा व कराड तालुक्याच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून ते कार्यरत राहिले. कराड शहराला एक ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक परंपरा आहे. ‘विकासदूत’ बाबांनी ती जाणिवपूर्वक जपण्याचा प्रयत्न केला. कराड शहराच्या नाविन्यपूर्ण विकासासाठी त्यांनी कोटयावधी रुपयांचा निधी दिला. कराड शहरालगतच असणाऱ्या मलकापूर शहराने प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्याकडे झेप घेतली आहे. शहराने विविध योजना राबवून विकासाच्या दिशेने घेतलेली उत्तूंग भरारी इतरांसाठी प्रेरणादायी आहे. मलकापूरमधील नेतृत्वास बाबांचे लाभलेले मार्गदर्शन व सहकार्य यामुळे या शहराचा चेहरामोहरा पूर्ण बदलला हे सत्य नाकारुन चालणार नाही. दोन्ही शहरांचा अनोख्या पध्दतीने झालेल्या विकासामुळे पृथ्वीराजबाबांना ‘विकासदूत’ ही बिरुदावली सार्थ ठरते.
आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वगुणसंपन्न नेते आहेत. त्यांच्या अनेक गुणांपैकी नम्रता व व्यासंगी वृत्ती हे गुण मला विशेष भावतात. गुरुजनांविषयी आदर व कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे त्यांच्याकडून शिकावे. माझे वडील आदरणीय स्व. गोरखनाथ मारुती जाधव (गुरुजी) यांचे व पृथ्वीराजबाबांचे गुरु-शिष्याचे नाते आहे. बाबा हे वडीलांचे तिसरीतील थेट विदयार्थी आहेत. शनिवार पेठेतील लल्लूभाई चाळीतील प्राथमिक शाळेत बाबांचे काही काळ शिक्षण झाले आहे. वडीलांची सार्वजनिक व राजकीय कारकीर्द श्रीनिवासजी पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, प्रकाशबापू पाटील, मनोहरभाऊ शिंदे यासारख्या मान्यवरांनी जवळून पाहिली आहे. म्हणूनच वडीलांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभासाठी 2011 मध्ये प्रमूख पाहुणे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांना अमृतमहोत्सव समितीचे पदाधिकारी असणाऱ्या या मान्यवरांनी निमंत्रित केले. आपल्या गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाबादेखील महत्वाचा शासकीय कार्यक्रम बाजूला ठेऊन उपस्थित राहिले. आपल्या भाषणात स्वत:च्या जडणघडणीत वडीलांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे नम्रपणे नमूद केले. आम्हा कुटूंबियांच्या दृष्टीने ही एक अनोखी गुरु दक्षिणाच होती.
राजकारणातील स्वच्छ व निष्कलंक प्रतिमेचे असणारे महत्व हे बाबांकडे पाहून अधोरेखित होते. 2019 ची विधानसभेची निवडणूक बाबांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर लढवली व समोर सर्व शक्तींनीयुक्त प्रतिस्पर्धी असतानाही ते विजयी झाले. त्यांच्या या विजयामध्ये पक्षाचे तिकीट व केलेली विकासकामे या जमेच्या बाजू होत्या हे जरी मान्य केले, तरी या विजयामागे बाबांची जनमानसातील स्वच्छ व निष्कलंक प्रतिमा देखील तितकीच महत्वाची होती, याकडे डोळेझाक करुन चालणार नाही. जर बाबांच्या जागी दुसरे कोणी असते तर आज आपणास वेगळे चित्र पहावयास मिळाले असते.
बाबा सध्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रीय काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन घेऊन स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराशी सुसंगत असा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ घडवून त्यास एक वेगळा आयाम देण्याचा ते सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
अशा या ‘विकासदूतास’ वाढदिवसानिमित्त आम्ही कुटूंबिय दिर्घायुष्य चिंतीतो. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
मुकेश मोहिते, कराड
जनसंपर्क अधीकारी
आ.पृथ्वीराज चव्हाण
कराड कार्यालय....
No comments:
Post a Comment