वेध माझा ऑनलाइन - एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही. काहीही संबंध नसताना एमआयएमने आघाडीसाठी दिलेली ऑफर शंभर टक्के भाजपकडून आली आहे. एमआयएमने ऑफर द्यायची व भाजपने टीकेचा भडिमार करायचा, हाच डाव आहे. ज्यांच्याकडून धोका आहे त्यांना बदनाम आणि नामशेष करण्याची ही चाल आहे. सर्वाधिक पाकधार्जिण्या गोष्टी भाजपच्या काळात झाल्या, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला.
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेना खासदार, जिल्हाधिकारी, संपर्क प्रमुखांशी उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संवाद साधला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेवर होणाऱ्या टीकेचा ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. तुमची सत्तेची स्वप्ने आम्ही चिरडून टाकली म्हणून आम्ही मुस्लीमधार्जिणे असू तर मोहन भागवतांच्या विधानांचा काय अर्थ काढायचा, असा प्रश्न करत ठाकरे यांनी भागवतांची विविध विधाने वाचून दाखविली.
मग, आता त्यांच्या नावापुढे खान लावणार का, असाही टोला लगावला. हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असेसुद्धा उद्या हे म्हणतील. आपला तो बाबा इतरांचे गुंड असा हा प्रकार आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेला जनाबसेना म्हटले जात आहे. आपण हिंदुत्व सोडलेले नाही. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात, त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचे. आम्ही काय मूर्ख नाही आणि भाजपसारखे सत्तेसाठी लाचारही नाही, असा टोला त्यांनी लगावला.
No comments:
Post a Comment