वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे मंत्र्यांकडून केंद्रीय यंत्रणाकडून दबाव आणल्याचा आरोप केला जात आहे. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच महाविकास आघाडीकडून केंद्रीय तपास यंत्रणावर दबाव आणला जात आहे, असा पलटवार करून मिशन महाराष्ट्राचे संकेत दिले आहे.
पाच राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपच्या मुख्यालयात विजय सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरून पंतप्रधानांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केला.
'आणखी एक विषय आहे. हा विषय भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई रोखण्याचं षडयंत्र. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवा की नको? आपल्या देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात, भ्रष्टाचारींच्या प्रती द्वेष आहे. देशाच्या कमाईला लुटून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची ओळख बनली आहे' अशी टीका मोदींनी केली.
तसंच, 'भाजप २०१४ मध्ये एक प्रामाणिक सरकारचं वचन देत निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2019 ला नागरिकांनी पुन्हा विश्वास दाखवला. मोदी सरकारचं भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करु शकतं, असा नागरिकांचा विश्वास आहे. पण आज निष्पक्ष संस्था भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करतात तेव्हा हे लोक त्या संस्थांना बदनाम करण्यासाठी पुढे येतात. ते आपल्या इको सिस्टिमच्या मदतीने केंद्रीय यंत्रणांवर दबाव निर्मिती करत आहेत. तपास यंत्रणांना रोखण्यासाठी हे लोक आपल्या इको सिस्टिमसोबत मिळून नवनवे मार्ग शोधतात. या लोकांना देशाच्या न्यायपालिकेवरही विश्वास नाही. आधी हजारो कोटींची भ्रष्टाचारा करायचा, त्यानंतर तपासही करु द्यायचा नाही, तपास सुरू झाला तर यंत्रणांवर आपल्या इको सिस्टिमच्या मदतीन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो' असा आरोपच मोदींनी केला.
'ही या लोकांची प्रवृत्ती आहे. हे लोक कोणत्याही भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई होताच धर्म, जाती, प्रदेशचा रंग देतात. कोणत्या माफियाविरोधात कोर्ट काही निकाल सुनावते तर त्याचाही संबंध हे लोकं जातपातीशी जोडतात. मी सर्व सांप्रदायांना विनंती करतो की अशा प्रवृत्तींनी समाज आणि संप्रदायापासून दूर करा' असं आवाहन करत मोदींनी एका प्रकारे महाराष्ट्र सरकारला कडक इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment