Thursday, June 8, 2023

सुप्रियाताई ,तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटेल ; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे याना झणझणीत टोला

वेध माझा ऑनलाइन । बुधवारी रात्री मीरा-भाईंदरमध्ये एका ५६ वर्षीय व्यक्तीने ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मनोज साने असं आरोपीचं नाव असून मृत महिलेचं नाव सरस्वती वैद्य आहे. आरोपीनं सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्यासाठी ते भाजले. काही तुकडे मिक्सरमधून काढले आणि बादलीत व पातेल्यात लपवून ठेवले. या धक्कादायक प्रकारावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं असताना त्यावर आता भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मीरा-भाईंदरमधील या प्रकारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आरोपी मनोज साने गेल्या तीन वर्षांपासून सरस्वती वैद्यसोबत लिव्ह-इनमध्ये राहात होता. मात्र, बुधवारी शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी दरवाजाचं कुलूप तोडलं, तेव्हा आरोपीनं महिलेचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं.

या घटनेवरून सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. “गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे”, असं सुप्रिया सुळेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 चित्रा वाघ यांचं ट्वीट!
दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या ट्वीटनंतर चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टॅग करून टीका करणारं ट्वीट केलं आहे. “सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल. किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो?” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये केला आहे.

तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्षं सापडली नाही. तेव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं. श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही ३५ तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच”, असंही वाघ यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

No comments:

Post a Comment