वेध माझा ऑनलाइन । शिवरायांचा अखंड जयघोष, मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि तरुणाईच्या सहभागाने निर्माण झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कराड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने शिवतीर्थ (दत्त चौक कराड) ते सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे स्मृतीस्थळ (तळबीड) अशी ‘शिवराज्य बाईक रॅली’ काढण्यात आली. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवतीर्थ (दत्त चौक कराड) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला डॉ. भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन शिवराज्य बाईक रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. तेथून पुढे ही रॅली शाहू चौक, जुना कोयना पूल, वारुंजी फाटा, राष्ट्रीय महामार्गावरुन तळबीड येथे पोहचली. छत्रपती शिवरायांचा अखंड जयघोष करत निघालेल्या या रॅलीत युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तळबीड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करुन मानवंदना देण्यात आली. यानंतर जखिणवाडी (ता. कराड) येथील विद्यार्थी-युवकांनी शिवकालीन मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करत रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची घटना ही एका नव्या युगाची नांदी होती. आपल्या राज्यातील रयत सुखी, समाधानी व्हावी यासाठी छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य अभूतपूर्व असे आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी आजच्या या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवराज्य बाईक रॅली काढण्यात आली.
पुढील वर्षापासून तळबीड येथे दरवर्षी विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाच्या सुशोभिकरणासाठी आणि एकूणच तळबीड गावच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.
याप्रसंगी तळबीडच्या सरपंच सौ. मृणाल उमेश मोहिते, उपसरपंच वैशाली पाटील, भाजपा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, राजू मुल्ला, कृष्णा कारखान्याचे संचालक सयाजी यादव, उमेश मोहिते, मोहनराव जाधव, सुहास कदम, दादासो मोहिते, अनिल वाघमारे, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक नारायण शिंगाडे, प्रमोद पाटील, सूरज शेवाळे, रमेश मोहिते, संतोष हिंगसे यांच्यासह युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment