Monday, June 5, 2023

राजस्थान काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप? सचिन पायलट नवा पक्ष काढण्याच्या तयारीत?

वेध माझा ऑनलाइन । कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात भाजपविरोधी पक्षांनी स्वतंत्र आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपाला पराभूत करता येऊ शकतं, अशा आशयाची विधानं विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच होणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी आडाखेही बांधले जात आहेत. याचदरम्यान राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा आहेत माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट!

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या नाराजीच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत. यासंदर्भात पायलट यांनी वेळोवेळी जाहीर भूमिकाही घेतल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस हायकमांडनं केलेल्या मध्यस्थीनंतर पुन्हा एकदा सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील वाद शमल्याचं सांगिलतं गेलं. आता पुन्हा एकदा सचिन पायलट यांच्या रुपाने राजस्थान काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

सचिन पायलट नवीन पक्ष काढणार?
गेल्या काही दिवसांपासून सचिन पायलट यांनी आपल्याच पक्षाच्या राज्य सरकारविरोधात ठाम भूमिका मांडल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी असलेले तणावपूर्ण संबंध चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात आता सचिन पायलट काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त ‘द वीक’नं दिलं आहे. या वृत्तानुसार सचिन पायलट लवकरच काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा करणार असून नवा पक्ष स्थापन करणार आहेत. नव्या पक्षाच्या घोषणेची तारीखही ठरल्याचं सांगितलं जात आहे.

कधी होणार नव्या पक्षाची घोषणा?
‘द वीक’च्या वृत्तानुसार सचिन पायलट येत्या आठवड्याभरात अर्थात ११ जून रोजी नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या अवघ्या काही महिने आधी काँग्रेससमोर या पक्षफुटीमुळे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. या सर्व धोरणांमध्ये सचिन पायलट यांना प्रशांत किशोर यांच्या आयपॅक संस्थेनं मदतीचा हात पुढे केल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तात करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment