वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी आज मोठा दिवस आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली स्थापन केलेल्या शिवसेनेचे आज दुर्दैवाने दोन तुकडे झाले आहेत. शिवसेनेतला भलामोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला गेला आहे. विशेष म्हणजे आपण शिवसेनेतच असून आपल्या पक्षाचं नाव शिवसेना आहे आणि आपलं निवडणुकीचं चिन्ह धनुष्यबाण आहे, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या दाव्याला विरोध करत आहेत. खरंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर हे भलंमोठ संकट आहे. कारण धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाकडे जातं हे महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे धनुष्यबाण चिन्हा संदर्भात आज निवडणूक आयोगात अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे चिन्ह नेमकं कोणत्या गटाला मिळतं किंवा ते गोठवण्यात येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघाची जागा रिकामी झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना चिन्हाबाबतची सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment