Tuesday, October 4, 2022

पत्रकार महेश सूर्यवंशी याना राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर ; गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी होणार वितरण...

वेध माझा ऑनलाइन - विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी धोंडेवाडी (ता.कराड) येथील आईसाहेब शालन शेडगे फाउंडेशनच्यावतीने आदर्श माता पुरस्कार व राज्यस्तरीय विशेष पुरस्कार देण्यात येतो. यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार मान्यवरांना आदर्श माता पुरस्कार व चार राज्यस्तरीय विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानदेव शेडगे यांनी दिली.दरम्यान, पत्रकार महेश भानुदास सुर्यवंशी यांना या संस्थेने पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला आहे

   धोंडेवाडी येथील आईसाहेब शालन शेडगे फाउंडेशनच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. विशेषतः विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर गुणात्मकता वाढावी यासाठी फाउंडेशनच्यावतीने विशेष भर दिला जातो.तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठीही फाउंडेशन मोलाचे योगदान देत आहे. फाउंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी आदर्श माता पुरस्कार व राज्यस्तरीय विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी मंगला सुभाष ढगे (उंब्रज), शालन रघुनाथ खबाले (विंग), सुमन शंकर यादव (कालेटेक), शोभाताई अरुण चव्हाण(कोळे) यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर प्रा.विजय महादेव लिगाडे( विद्यानगर-कराड), प्रा.बाजीराव मारुती पाटील( विद्यानगर-कराड) यांना राज्यस्तरीय विशेष शैक्षणिक पुरस्कार, महेश भानुदास सुर्यवंशी (कराड) यांना राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार तर डॉ.सौ. प्रियदर्शनी विक्रम शिंदे( कासार शिरंबे) यांना राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून गुरुवार दि.6 ऑक्टोबर रोजी धोंडेवाडी येथे शानदार समारंभात  मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे ज्ञानदेव शेडगे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment